‘मोदी सरकार हाय हाय, तानाशाही नही चलेगी’, शेतकऱ्यांची व्यथा मांडणाऱ्या राजू शेट्टींची पोलिसांनी पकडली कॉलर

4

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान पोलिस आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. या मोर्चात मोदींचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यावरुन मंगळवारी दुपारी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये जोरदार गोंधळ उडाला. यामध्ये माजी खासदार राजू शेट्टी यांना पोलीसांनी कॉलर धरुन खाली पाडल्याने वातावरण तापले आहे.

दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वाभिमानीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान मोदींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत होते. केंद्र सरकारच्या कृषी धोरणांविरोधात दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आता राज्यातही परिणाम होताना दिसत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना या कृषी कायद्याविरोधात आक्रमक झालेली दिसत आहे. यावेळी स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि पोलिसांच्यात जोरदार झटापट सुरू झाली. दरम्यान माजी खासदार राजू शेट्टी यांनाही धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

मोदी सरकार हाय हाय, तानाशाही नही चलेगी, शेतकऱ्यांना खलिस्तानवादी म्हणणाऱ्या शेतकऱ्यांच्या अशा घोषणा सुरु होत्या. यावेळी एक चारचाकी मोर्चेकरीजवळ येऊन उभी राहिली. पोलीसांची नजर चुकवून तयार केलेला पुतळा बाहेर काढत असतानाच पोलीसांनी धाव घेतली आणि शेतकरी आणि पोलिसांमध्ये झटापट सुरु झाली. पुतळा पेटवतील म्हणून पोलिसांनीही लगेच पाण्याच्या बादल्या भरुन त्यावर फेकल्या गेल्या. एवढ्यात पुतळा खेचाखेची सुरु असताना पोलीसांनी राजू शेट्टी यांच्या कॉलरवरच हात घेतल्याने शेतकरी कार्यकर्ते अधिकच संतापले आहेत. या झटापटीमध्ये राजू शेट्टी यांचे घड्याळही हातातून पडले, चप्पल बाजूला फेकल्या गेल्या. हा प्रकार पाहून अधिक संतापलेल्या कार्यकर्त्यांनी पुतळयाचे शिल्लक राहिलेले अवशेष पेटवून दिले. १० मिनिटे चाललेल्या या झटापटीमध्ये अनेकांचे अंगावरचे कपडेही फाटले आहेत. पोलीसांच्या दबावाला न घाबरता येत्या काही दिवसांमध्ये दिल्लीत ज्या प्रकारे आंदोलन करण्यात आले आहे त्या प्रकारे आंदोलन महाराष्ट्रात केलं जाणार असल्याचंही राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे.