पूजा चव्हाण प्रकरण आत्महत्या की राजकारण?

134

सध्या बीड मधील पूजा चव्हाण या तरुणीच्या पुणे य़ेथील आत्महत्या प्रकरणाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. त्याचबरोबर पूजेच्या हत्येचा संबंध महाविकास आघाडीतील एका मंत्र्यासोबत असल्याच्या ११ ऑडिओ क्लिपही व्हायरल झाल्या आहेत. यामुळे विरोधक आक्रमक झाले असून याप्रकरणावरून राजकारणही चांगलेच तापले आहे.

पूजा चव्हाण ही मुलगी मूळची परळी वैजनाथ येथे राहणारी होती. ती फेमस टीक टॉक स्टारही होती. काही दिवसांपूर्वी ती पुण्यात इंग्लीश स्पीकींगचा कोर्स करण्यासाठी आली होती. येथील वानवडीमधील हेवन पार्क सोसायटीत ती भाऊ व मित्राबरोबर राहत होती. ८ फेब्रुवारीला तिने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. पूजाने हे टोकाचे पाऊल का उचलले, याची उलटसुलट चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली. पूजा आणि तिच्या मित्राचे राज्य सरकारमधील एका मंत्र्यासोबतचे सार्वजनिक कार्यक्रमांमधील फोटो व्हायरल होण्यास सुरुवात झाली. चार दिवसांनंतरदेखील या आत्महत्येचे गूढ कायम असल्याने फडणवीस यांनी या प्रकरणात सखोल चौकशीची मागणी केली आहे.

दोन दिवसांपूर्वीच पुण्याच्या पोलिस आयुक्तांना भेटून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. सोशल मीडियावर राज्य सरकारमधील एका मंत्र्याचे नाव या प्रकरणात घेतले जात असल्याने पोलिसांनी या प्रकरणाचा सोखमोक्ष लावण्याची गरज असल्याचे भाजप कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. पूजा आणि तिच्या मित्राचे जसे राज्य सरकारमधील मंत्र्यांसोबत सार्वजनिक कार्यक्रमांमधील फोटो आहेत, तसेच भाजपच्या राज्य पातळीवरील नेत्यांसोबतदेखील फोटो आहेत. त्यामुळे या प्रकरणाचे गूढ आणखी वाढले आहे; परंतु पूजाच्या आईवडीलांनी अजूनपर्यंत गप्प राहणे पसंत केले; मात्र या प्रकरणाला राजकीय वळण लागण्याची चिन्हे दिसू लागल्याने पुणे पोलिसांनी स्वतः या प्रकरणात लक्ष दिले आहे.

पूजा चव्हाणच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्या संशयित मंत्र्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवावा, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे. यासदंर्भात समाजमाध्यमांवर वाघ यांनी ध्वनिचित्रफीत टाकली असून पूजाची आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप त्यांनी केला. पूजाचा मोबाइल व लॅपटॉप दरवाजा तोडून ताब्यात घ्या, असे हे मंत्री तिच्यासोबतच्या मित्रास का सांगत आहेत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

या प्रकरणाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. राजकीय पक्षांना दुसरे काही काम नसल्याने या प्रकरणावरून ते वादंग निर्माण करत आहेत. मंत्री धनंजय मुंडेंवरही आरोप झाले. नंतर सत्य सर्वांसमोर आले, असेही ते म्हणाले. पूजा ज्या व्यक्तीशी बोलत आहे, अशा अनेक ध्वनिफिती समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्या आहेत. त्यासंदर्भात फडणवीस यांनी राज्याचे पोलिस महासंचालक यांना पत्र लिहिले. तसेच ध्वनिफिती जोडल्या आहेत. या ध्वनिफितीमध्ये पुरुषी आवाज कोणाचा आहे, ती व्यक्ती काय बोलते, या मंत्रिपदावर असलेल्या व्यक्तीने पूजाला आत्महत्या करण्यास भाग पाडले काय, यासंदर्भात सर्वंकष चौकशी करावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.

पूजा चव्हाण हिच्या डोक्याला व पाठीला मार लागल्याने तिचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे. याबाबत समाजमाध्यमामध्ये व्हायरल झालेल्या २ ऑडिओ क्लिप ऐकल्या असून त्यावरून नेमके समजू शकत नसल्याचे व अद्याप याबाबत कोणी तक्रार केली नसल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे या सर्व ऑडिओ क्लिप्सची सखोल आणि सर्वंकष चौकशी होणे नितांत गरजेचे आहे. ही चौकशी तत्काळ करून बंजारा समाजात अतिशय लोकप्रिय असलेल्या या तरुणीला तत्काळ न्याय द्यावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी.