छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले समाजकार्य व राबविलेली प्रबोधन चळवळ समर्थपणे जनमाणसांपर्यंत नेण्याचे महत्त्वपूर्ण कार्य शाहिरी परंपरेने केले, असे मत प्रसिध्द शाहीर संभाजी भगत यांनी आज मांडले.
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचे नववे पुष्प गुंफताना ‘महाराष्ट्राची शाहिरी परंपरा’ या विषयावर शाहीर भगत बोलत होते.
मातृसत्ताक मुल्यातून १३ व्या शतकात झालेला शाहिरीचा उगम आणि पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी शाहिरी पंरपरेचा केलेला प्रभावी वापर. पेशवाईत शाहिरीत झालेला बदल.
पुढे महात्मा ज्योतिराव फुले यांनी ‘सत्यशोधक जलसे’ उभारून जनप्रबोधनाचे केलेले कार्य डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी समाजक्रांतीसाठी उभारलेले सत्याग्रह व लढ्यांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी सुरु केलेले ‘आंबेडकरी जलसे’, ‘लाल बावटा कलापथक’, ‘समाजवादी कलापथक’ ते संयुक्त महाराष्ट्राच्या चवळवळीत शाहिरीने प्राण फुंकुन केलेले प्रबोधन असा पटच शाहीर भगत यांनी यावेळी उलगडला.