गेल्या दोन महिन्यांपासून दिल्ली सिमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला काल प्रजासत्ताकदिनी शेतकर्यांकडून काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर मोर्चादरम्यान हिंसेचे वळण लागले. यावरुन आता राजकारण सुरु झालेले आहे. हिंसाचाराला गृहमंत्री अमित शहा जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. याप्रकरणी केंद्रिय माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पलटवार करत राहुल गांधी आणि कॉंग्रेसवर आरोप केले.
समर्थनाच्या आडून कॉंग्रेस शेतकर्यांना उकसवण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी पत्रपरिषदेत सांगीतले. आंदोलनाच्यावेळी दिल्लीच्या काही भागात झालेल्या हिंसेचा ठपका कॉंग्रेसने सरकार आणि पोलिसांवर ठेवला. प्रत्युतरादाखल प्रकाश जावडेकर लगेच यांनी पत्रपरिषद बोलावली.
समर्थनाच्या आडून कॉंग्रेसने जाणूनबुजून शेतकऱ्यांना चिथावण्याचं काम केलं, असा आरोप त्यांनी यावेळी केला. देशातील शांतता राहुल गांधी आणि त्यांच्या कॉंग्रेसला बघवत नाही. ट्रॅक्टर पलटी झाल्यामुळे एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला. पण पोलिसांनी त्याला गोळ्या घालून ठार मारल्याचं कॉंग्रेस म्हणते. अशाप्रकारे अफवा पसरवून कायम आगीत तेल ओतण्याचा कॉंग्रेस नेत्यांचा प्रयत्न असतो. सीएए आंदोलनावेळीसुद्धा त्यांनी हेच केले.
सततच्या होणार्या पराभवामुळे राहुल गांधी आणि कॉंग्रेस हताश आणि निराश आहे. देशातील शांतता भंग करुन त्यावर अशाप्रकारचे घृणास्पद राजकारण करण्याची संधी ते शोधत असतात. असा आरोपदेखील प्रकाश जावडेकर यांनी यावेळी केला. दिल्लीत उद्भवलेल्या हिंसाचारानंतर कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदिप सुरजेवाला यांनी सरकारच्या असंवेदनशील धोरणांमुळेच हे घडले असे आरोपदेखील केले होते.