विलगीकरणात असलेले पटोले सार्वजनिक कार्यक्रमात हजर राहिल्याने, “नाना च्या नाना तऱ्हा, सकाळी आयसोलेशन अन रात्री सेलिब्रेशन”, असा टोला भाजप नेते आमदार प्रसाद लाड यांनी त्यांना लगावला आहे.
खुद्द पटोले यांनीच शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात अन्य व्यक्तींसह स्वतः उपस्थित राहिल्याची किमान तीन छायाचित्रे ट्वीट केली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जुहू, मुंबई येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमास उपस्थित राहून महाराजांना अभिवादन केले, असे पटोले यांनी त्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
पटोले यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाल्यावर राज्यपालांसह अन्य भाजप नेत्यांवर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे आता भाजपने देखील त्यांना लक्ष करून त्यांना त्याचप्रकारे प्रत्युत्तर देण्याचे डावपेच आखल्याची चर्चा यानिमित्ताने होत आहे.
नाना पटोले यांच्या मुंबईतील घरातील दोघांना कोरोना झाल्यामुळे सावधगिरीचा उपाय म्हणून पटोले हे विलगीकरणात गेल्याचे सांगितले जात होते. मात्र तरीही शुक्रवारी (ता. 19) रात्री जुहू येथे शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमास पटोले उपस्थित राहिले.