प्रवीण दरेकरांनी निधीची चिंता करू नये; चांगल्या कामांसाठी अजित पवार खंबीर : आमदार लंके

209

ग्रामपंचायत बिनविरोध निवडून दिल्यास, आमदार निधीतून त्या गावाला 25 लाख रुपये देण्याचा निर्णय पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी घेतला आहे. ग्रामपंचायत बिनविरोध निवडणूकिमुळे गावचा संघर्ष कमी होईल, आणि गावचा विकास यातून साधता येईल, असे आमदार लंके म्हणाले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांची ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध करण्याची दिलेले प्रलोभन योग्य नाही, अनेक ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यास हा निधी आणणार कोठून, अशा शब्दांत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आमदार लंके यांना टोला लगावला होता. तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या तर हा मोठा निधी आमदार लंके कोणत्या निधीतून देणार. निधी देण्यावरही अनेक बंधने आहेत. असे असताना लंके यांनी केलेली घोषणा प्रत्यक्षात येऊ शकत नाही, असं प्रवीण दरेकर म्हणाले होते.

यावर आता निलेश लंकेंनी प्रवीण दरेकरांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. प्रवीण दरेकर यांना ग्रामीण भागातील राजकारण माहिती नाही. त्यामुळे ते तसे बोलतात. निवडणुकांमध्ये झालेले तंटे दहा वर्षही मिटत नाहीत. असे तंटे होऊ नये म्हणून आम्ही प्रयत्नशील असतो. निवडणुका टाळाव्यात, बिनविरोध सदस्य निवडले जावेत. सरपंचही बिनविरोध व्हावेत, अशी अपेक्षा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, महाराष्ट्र राज्याच्या आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे अध्यक्ष पोपटराव पवार यांनीही अनेकदा व्यक्त केली.

गावातील तंटे मिटावेत, यासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले. मी घेतलेल्या भूमिकेबद्दल त्यांनी माझे अभिनंदन केले. ग्रामीण भागाचा त्यांचा अभ्यास सखोल आहे. लहान प्रश्नही त्यांना माहिती आहेत. गावे आदर्श करताना ते हीच शिकवण गावांना देत असतात. प्रत्येक भाषणातून ते हे मार्गदर्शन करीत असतात. गावातील युवकांनी भांडणे टाळावेत. एकत्र येऊन ग्रामपंचायती बिनविरोध कराव्यात, असे ते कायम आवाहन करीत असतात. असे लंके म्हणाले आहेत

तर, मी घोषणा केल्यानंतर राज्यातील अनेक राजकीय नेत्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायती बिनविरोध करण्याचे आवाहन केले आहे. असे असताना दरेकर मात्र विरोधात बोलत आहेत. त्यामुळे दरेकर यांनी निधीची चिंता करू नये. चांगल्या कामांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आम्हाला पुरेसा निधी देतील, असे आमदार लंके यांनी सांगितले.