प्रवीण दरेकरांचा सवाल : विचारतात पुणे शहर हे गुन्हेगारांचे शहर होते की काय?

9

करोनाच्या संकटात सर्वसामान्य माणूस पूर्णपणे उद्‌वस्त झाला आहे. आर्थिकदृष्ट्‌या वाईट स्थिती झाली आहे. महाराष्ट्रात खून, बलात्कार, सामूहिक अत्याचार मोठ्या प्रमाणात होत आहेत. राज्यभरात फिरत असताना यावर आवाज उठवला, मात्र, त्याबाबत कुठलेही नियंत्रण राज्य सरकारकडून आणलेले दिसत नाही. पुणे शहर हे गुन्हेगारांचे शहर होते की काय? असा प्रश्‍न प्रवीण दरेकरांनी केला आहे.

पुण्यातील त्या युवतीची आत्महत्या कोणत्या कारणांमुळे झाली, त्याची चौकशी करण्याची मागणी भाजपने केली आहे, अशी माहिती विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली. ते आज कोल्हापुरात बोलत होते.

बांधकाम व्यावसायिकांची 50 टक्के फी कमी करत आहे. दारूवरील कर कमी करत आहे. म्हणजेच मोठ्या लोकांचे चोचले पुरवत असताना सर्वसामान्य माणसांना वेठीस धरण्याचे काम करत आहे. या सरकारला सुबुद्धी देण्याचे साकडे मी करवीर निवासिनी श्री अंबाबाईला घातले आहे, असे दरेकर म्हणाले.

कोरोनामुळे सर्वसामान्य जनता आर्थिक संकटात सापडली आहे. शेतकरी उद्‌ध्वस्त झाला असेल, व्यापाऱ्यांचा उद्योग झाला नसेल तर ते बिल कुठून भरणार? असा प्रश्‍नही दरेकर यांनी केला.

महाविकास आघाडी टिकवणे हेच सरकार करत आहे. त्यांना सर्वसामान्य जनतेचे काय चाललंय? याकडे लक्ष देण्यास वेळ नाही, सर्वसामान्य ग्राहकांची वीजबिल माफ व्हावे, यासाठी भाजप पुन्हा एकदा रस्त्यावर उतरेल, असा इशारा देखील प्रवीण दरेकर यांनी दिला.