संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली. राष्ट्रपतींच्या अभिभाषणानं अधिवेशन सुरू झालं. अभिभाषणात राष्ट्रपतींनी कोरोना आणि इतर संकटांचा उहापोह करताना केंद्र सरकारनं घेतलेल्या निर्णयाचं कौतूक केलं.
नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी उल्लेख केला. केंद्र सरकारकडून घेण्यात आलेल्या निर्णयाचं कौतूक करतानाच राष्ट्रपतींनी कृषी कायदे फायद्याचे असल्याचं सांगितलं. त्याचबरोबर प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वजाच्या अपमानाची घटना दुर्दैवी असल्याचं सांगत नाराजी व्यक्त केली.
जवळपास १६ विरोधी पक्षांनी राष्ट्रपतींनी नव्या कृषी कायद्याच्या अध्यादेशावर विरोधकांशी चर्चा न करत स्वाक्षरी केल्याच्या निषेधार्थ या अभिभाषणावर बहिष्कार घातला आहे. काही वेळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद भवनाबाहेर पत्रकारांशी बोलताना सांगितले की सादर होणारा अर्थसंकल्प हा यापूर्वी कोरोना काळात २०२० मध्ये सादर झालेल्या मिनी बजेटचाच एक भाग असेल.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण या १ फेब्रुवारीला बजेट सादर सादर करणार आहेत.