मी त्यांच्या सारखा, खोटं बोलणारा नेता नाही असे प्रतिपादन कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज आसामातील चायगाव व बारखेत्री येथील सभेत बोलताना केले.
छत्तीसगड मध्ये आम्ही सत्तेवर आल्यानंतर केवळ सहा तासात कर्जमाफीचा निर्णय घेतला. केंद्रात सत्तेवर असताना देशातील शेतकऱ्यांचे 72 हजार कोटी रूपयांचे कर्ज आम्ही माफ केले होते अशी माहितीही त्यांनी दिली.
जर तुम्हाला आसाम विषयी किंवा शेतकरी आणि अन्य विषयांविषयी खोटी माहिती ऐकायची असेल तर तुम्ही टीव्ही लावा आणि मोदींची भाषणे ऐका. पण त्यातील सत्त्य जाणून घ्यायचे असेल तर तुम्हाला मला ऐकावे लागेल असे ते म्हणाले.
सीएए कायदा तुम्हाला येथे नको आहे, युवकांना रोजगार हवा आहे, चहाच्या मळ्यात काम करणाऱ्यांना 365 रूपये रोज रोजंदारी हवी आहे, दोनशे युनिटची वीज मोफत हवी आहे, महिलांना दर महा दोन हजार रूपयांची मदत हवी आहे, या तुमच्या सगळ्या मागण्या कॉंग्रेसने मान्य केल्या असून आमचा मुख्यमंत्री त्या मागण्या पुर्ण करेल अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
तसेच पंतप्रधान नरेद्र मोदी हे आठवड्यातील सातही दिवस चोवीस तास देशातील जनतेपुढे केवळ खोटेच बोलत असतात असाही आरोप त्यांनी केला आहे.