माजी मंत्री राजेंद्र दर्डा यांच्या फेसबुक पेजवरील नोंदी, निरीक्षणे, स्फुट लेख व अभिप्राय यांचे संकलन असलेल्या ‘माझी भिंत’ या पुस्तकाचे प्रकाशन आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे झाले. कार्यक्रमाला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, जलसंपदामंत्री जयंत पाटील, लोकमत समूहाचे अध्यक्ष विजय दर्डा, लेखक राजेंद्र दर्डा व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, सुंदर मराठी भाषेतून लिहिलेल्या आपल्या पुस्तकामध्ये राजेंद्र दर्डा यांनी अधूनमधून हिन्दी भाषेतील पंक्तींची चवदार फोडणी दिल्यामुळे ‘माझी भिंत’ पुस्तक अतिशय वाचनीय झाले आहे. महाराष्ट्रात आठ शतकांपूर्वी संत ज्ञानेश्वर महाराजांनी योग सामर्थ्याने भिंत चालविल्याचा उल्लेख आहे. समाजमाध्यमांच्या आजच्या युगात राजेंद्र दर्डा यांनी देखील आपली ‘आभासी भिंत’ यापुढेही सुरु ठेवावी.
लोकमत समूहाचे अध्यक्ष विजय दर्डा यांनी प्रास्ताविक केले तर राजेंद्र दर्डा यांनी पुस्तकासंदर्भातील आपली भूमिका स्पष्ट केली. राज्यपालांच्या हस्ते यावेळी लोकमतच्या ‘दीपोत्सव’ व ‘दीपभव’ या दिवाळी विशेषांकांचे प्रकाशन करण्यात आले. देवेंद्र दर्डा यांनी आभार मानले तर लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार अतुल कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.