पुण्यात कोरोना संसर्गात शहरात बेड्सची आगामी गरज लक्षात घेत नियोजन करण्यात आले आहे. सीसीसी बेड्ससोबतच शहरात ऑक्सिजन बेड्स वाढवण्यासंदर्भात एक्शन प्लॅन तयार केला जात आहे. या प्लॅनअंतर्गत सीसीसीमध्येही जवळपास १० टक्के ऑक्सिजन बेड्स उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. ही कार्यवाही तातडीने करण्याच्या सूचना प्रशासनाला महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिल्या आहेत.
बेड्स व व्हेंटीलेटर्स तातडीने वाढवण्यासंदर्भात महापौर कार्यालयात विभागीय आयुक्त सौरव राव, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त महापालिका आयुक्त रुबल अग्रवाल व इतर अधिकारी यांच्यात बैठक झाली. या बैठकीत व्हेंटीलेटरची गरज लक्षात घेता तातडीने ३० व्हेंटीलेटर महापालिका स्वत: उपलब्ध करून देण्याचे निश्चित करण्यात आले.
शहरातील कोरोना रुग्णांकरता बेड्सची संख्या शीघ्रतेने वाढविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या व त्यांची दखल घेऊन जलद गतीने कार्यवाही करण्याची सूचना देण्यात आल्या आहेत.
‘COEP हॉस्टेल अथवा ॲग्रीकल्चर कॉलेज हॉस्टेल आणि उर्वरित कोविड केअर सेंटर त्वरीत सुरू करून त्या ठिकाणी १० % ऑक्सिजन बेड उपलब्ध केले जाणार आहेत. महानगरपालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये देखील क्षमतेनुसार १०% ऑक्सिजन बेड्स उपलब्ध केले जाणार आहेत. शहरातील हॉटेल व्यावसायिकांबरोबर संपर्क करून संबंधित हॉटेल्समध्ये कोविड केअर सेंटर सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत.