बातमी पुण्यातील आहे. कोंबड्या अंडी देत नसल्याने एका पोल्ट्री चालकाने खाद्यपुरवठा करणाऱ्या कंपनीविरोधात पोलिसांत तक्रार केली आहे. या तक्रारीमुळे पोलीसही चक्रावले आहेत. मात्र, पोलिसांनी सदरील तक्रार दाखल करुन घेतली आहे. पण याप्रकरणाचा तपास करणार तरी कसा, असा मोठा प्रश्न पोलिसांसमोर उभा राहिला आहे.
आनंदी म्हातोबाची आळंदी येथील काही पोल्ट्रीमधील कोंबड्यांनी सदोष खाद्यामुळे मागील आठ दिवसापासुन अंडी देणे बंद केले आहे. त्यामुळे पोल्ट्री चालकांचे आर्थिक नुकसान होत आहे. रागावलेल्या पोल्ट्री चालकांनी सरळ पोलिसांत तक्रार दाखल केली. या सगळ्यात आता पोलीस नेमकी कारवाई कशी करणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
लक्ष्मण भोंडवे हे पोल्ट्री चालक आहेत. त्यांनी 4 एप्रिल रोजी कोंबड्या करिता खाद्य घातले होते. ते खाद्य दररोज दिले जात होते. ते खाद्य दिल्यापासून कोंबड्यांनी अंडी देणेच बंद केले.
यामुळे पोल्ट्री चालकांनी एका लॅबमध्ये कोंबड्यांची तपासणी केली. त्यामध्ये नव्याने सुरू केलेल्या खाद्यामुळे अंडी देणे बंद केले आहे, असे प्राथमिक तपासणीत आढळले. त्यामुळे लक्ष्मण भोंडवे यांनी पोलिसांत तक्रार दिली.