रेखा जरे यांच्या हत्येतील मुख्य आरोपी असलेल्या ‘त्या’ पत्रकाराचे पुणे विद्यापीठ अभ्यासक्रमातील पुस्तक हद्दपार

16

पुणे विद्यपीठाने राज्यशास्त्र विषयाच्या अभ्यासक्रमासाठी संदर्भ ग्रंथ म्हणून निवडलेले पत्रकार बाळ बोठे यांचे पुस्तक अभ्यासक्रमातून हद्दपार करण्याचा निर्णय घेतला असून, विद्यापीठाच्या विद्या परिषदेमध्ये सुध्दा पुस्तक रद्द करण्याबाबतची प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याची माहिती सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.नितीन करमळकर यांनी सांगितले.

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्येतील मुख्य सूत्रधार म्हणून समोर आलेल्या पत्रकार बाळ बोठे यांचे ‘राजकीय पत्रकारिता’ हे पुस्तक पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विषयाच्या ‘पॉलिटिकल जर्नलिझम’ या अभ्यासक्रमासाठी संदर्भ ग्रंथ म्हणून नेमण्यात आले होते.

विद्यापीठ कायद्यानुसार अभ्यास मंडळातील काही सदस्यांची निवड नॉमिनेशन मधून केली जाते. द्यापीठाच्या राज्यशास्त्र विषयाच्या अभ्यास मंडळाचे सदस्य म्हणून बोठे यांचे नॉमिनेशन करण्यात आले होते. कायद्यानुसार गंभीर गुन्ह्यातील घटनेतील आरोपीला विद्यापीठाच्या अधिकार मंडळाच्या बैठकीस उपस्थित राहण्यापासून प्रतिबंधित करता येतो. सोबतच अशा व्यक्तीचे सदस्य पद विद्यापीठाचे कुलगुरू रद्द करू शकतात, असे विद्यापीठातील सूत्रांनी सांगितले.