काल प्रजासत्ताक दिनादिवशी दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने अतिरिक्त तुकड्या तैनात करण्याचे आदेश दिले असतानाच पंजाब-हरयाणामध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. या रॅली दरम्यान पोलीस आणि शेतकरी आमने-सामने आले आहेत.
पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी दिल्लीतील हिंसाचारानंतर पोलीस यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर हरयाणातील काही जिल्ह्यातील मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. दिल्लीत २ महिन्यांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला मंगळवारी गालबोट लागलं. शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीने हिंसक वळण घेतलं आणि बघता बघता संपूर्ण दिल्ली हादरली. काही आंदोलकांनी लाल किल्ल्यावर साहिब ए निशाण ध्वज फडकावला होता.
यावेळी शेतकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या असून त्यामुळे या परिसरात तणाव निर्माण झाला आहे. दिल्ली व हरयाणातील काही भागात मोबाईल सेवाही बंद करण्यात आली आहे.
पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांचे माध्यम सल्लागार रवीन ठुक्राल यांनी ट्विट करून याबद्दल माहिती दिली आहे. मुख्यमंत्री अमरिंदर सिंह दिल्लीतील हिंसाचारानंतर राज्यातील कायदा व सुरक्षाव्यवस्था कोणत्याही किंमतीत कोलमडता कामा नये, असे आदेश राज्याच्या पोलीस विभागाला दिले आहेत, असं ठुक्राल यांनी म्हटलं आहे.