भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या कसोटी मालिकेत भारतीय खेळाडू दुखापतीमुळे बाहेर गेला आहे. फलंदाज केएल राहुल ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांमधून बाहेर पडला आहे. त्याच्या मनगटाला झालेल्या दुखापतीमुळे त्याने उर्वरित सामन्यातून माघार घेतली असून तो लवकरच भारतात परतणार आहे. शनिवारी भारतीय संघाच्या सराव सत्रात त्याला ही दुखापत झाली. सिडनीमध्ये 7 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या तिसऱ्या कसोटीआधी ही बातमी भारतीय संघासाठी काहीशी चिंतेची ठरु शकते.
याबाबत बीसीसीआयने आज सकाळी ट्वीट करुन याबाबत माहिती दिली आहे. “मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर शनिवारी सरावादरम्यान फलंदाजी करताना केएल राहुलच्या डाव्या हाताच्या मनगटाला दुखापत झाली होती. ही दुखापत पूर्णपणे बरी होण्यासाठी किमान तीन आठवड्यांचा अवधी लागेल असे सांगितले आहे. बंगळुरुमधील नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये त्याच्यावर उपचार होणार आहेत.
याआधी मोहम्मद शमी आणि उमेश यादव यांना दुखापतीमुळे संघाबाहेर बसावे लागले आहे. पहिल्या कसोटी सामन्यात शमीच्या उजव्या हाताला दुखापत झाली होती, तर दुसर्या कसोटीत उमेश यादवला दुखापतीने गाठले होते. आता आघाडीचा फलंदाज केएल राहुलच्या मनगटाला दुखापत झाल्याने टीएम इंडियासमोर संकट उभे राहिले आहे