औरंगाबाद जिल्ह्यात लागू होणारा लॉकडाऊनचा निर्णय जिल्हा प्रशासनाने मंगळवारी रात्री मागे घेतला. औरंगाबाद जिल्ह्यात लॉकडाऊन नकोच अशी भूमिका घेत खासदार इम्तियाज जलील यानी मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली होती. लॉकडाऊन मागे घेताच बुधवारी काढण्यात येणारा मोर्चा ही रद्द करण्यात आल्याची घोषणा खासदार इम्तियाज जलीलानी केली.
मात्र, या निर्णयानंतर जलील यांच्या घरासमोरुन एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी मिरवणूक काढली. यात खासदार इम्तियाज जलील यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते विनामास्क, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांना पायदळी तुडवत मिरवणुकीत सहभागी झाले होते.
या मिरवणुकी विरोधात बुधवारी सिटी चौक पोलीस ठाण्यात खासदार इम्तियाज जलील यांच्यासह इतर ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणत वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने टाळेबंदी करण्याची निर्णय घेतला होता. त्याला खासदार जलील यांनी तीव्र विरोध करत, जिल्हा प्रशासन विरोधात मोर्चाचे हत्यार उपसले होते.
सामान्य जनतेच्या मागणीनुसार लॉकडाऊनचा निर्णय रद्द केला. लॉकडाऊनचा निर्णय रद्द होताच खासदार इम्तियाज जलील यांच्या घरासमोर एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी मिरवणूक काढून केक कापून जल्लोष केला. विशेष म्हणजे खासदारांसह त्यांच्या एकाही समर्थकांनी मास्क घातलेला नव्हता. त्यामुळे आत्ता खासदार महोदय आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.