पवारांच्या आवाहनाला प्रतिसाद; देशातील पहिला इथेनॉल पासून ऑक्सिजन निर्मितीचा प्रयोग यशस्वी

26

इथेनॉल पासून ऑक्सिजन निर्मितीचा देशातील पहिला यशस्वी प्रयोग उस्मानाबाद जिल्ह्यातील धाराशिव साखर कारखान्यात झाला आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

देशात तसेच राज्यात ऑक्सिजन निर्माण करण्याची क्षमता वाढवण्यासाठी शरद पवारांनी इथेनॉल पासून ऑक्सिजन निर्मितीचा विचार साखर कारखान्यांकडे मांडला होता. या अनुषंगाने उस्मानाबाद जिल्ह्यातील धाराशिव साखर कारखान्याने यात पुढाकार घेतला.

शरद पवार यांनी आवाहन केल्यानंतर धाराशिव कारखान्याने हिंमत, धाडस दाखवले, पुढाकार घेऊन देशातला पहिला प्रकल्प सुरु केला, याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेच्यावतीने कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांचे आभार व्यक्त करतो, अशी भावना मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.

शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वीच साखर कारखान्यांनी इथेनॉलपासून ऑक्सिजन निर्मिती करावी, असे आवाहन केले होते. आवाहन केल्यानंतर धाराशिव कारखान्याने यात बाजी मारून हा प्रकल्प हाती घेतला आणि पूर्ण केला. केवळ १७ दिवसांत या ऑक्सिजन निर्मिती प्लांटची उभारणी केली. यामध्ये आता २० टन ऑक्सिजन निर्मिती होत आहे.