एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमात मनसेचा राडा, मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांकडून चोप मार

37

वसई विरार महापालिकेच्या परिवहन सेवेच्या उदघाटनासाठी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे वसईत आले होते. या कार्यक्रमात मनसे कार्यकर्त्यांनी आयुक्तांविरोधात घोषणाबाजी करत गोंधळ घातला आहे.
कार्यक्रम सुरू असताना प्रेक्षकांत बसलेल्या दोन मनसे कार्यकर्त्यांनी अचानक उठून आयुक्त गंगाथरन डी. यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. मात्र पोलिासंनी या कार्यकर्त्यांना बेदम चोप देत बाहेर काढले.

मनसे कार्यकर्ते आयुक्तांच्या भेटीची वेळ मागत होते. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने तेथे गोंधळ वाढला. त्यावेळी काही पोलिसांकडून धक्काबुक्की झाल्याने मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले. यावेळी मनसेकडून पोलिसांवर गंभीर आरोप करण्यात आले. पोलीस सरकारचे दलाल असल्या सारखे वागत आहेत. सत्ता येते जाते पण पोलिसांनी पोलिसांसारखे काम करावे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिंदाबाद घोषणा देणे चूक आहे का? सत्तेची दलाली आणि माज पोलिसांनी करू नये, असे मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे. 

आयुक्त मनसे कार्यकर्त्यांना भेटत नसल्याने मनसेच्या आयुक्तांवर राग होता. त्यासाठी मनसे कार्यकर्त्यांनी या आंदोलनाची रणनिती आखली होती. ‘आयुक्त साहेब वेळ द्या’ अशी घोषणाबाजी मनसे कार्यकर्त्यांनी केली. पोलिसांनी तात्काळ धाव घेत या दोन्ही कार्यकर्त्यांना चोप देत बाहेर नेले. या नंतर पुढील कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमात मनसे कार्यकर्ते गोंधळ घालणार असल्याची पोलिसांना माहिती लागली होती. त्यामुळे पोलिसांनी जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह ३५ कार्यकर्त्यांना आधीत ताब्यात घेतले होते. तरी पोलिसांची नजर चुकवून दोन कार्यकर्ते कार्यक्रमात शिरले आणि त्यांनी घोषणाबाजी केली आणि कार्यक्रमात गोंधळ उडवला.