भाजपच्या अधिकृत वेबसाइटवर भाजप खासदार रक्षा खडसे यांचा आक्षेपार्ह उल्लेख करण्यात आला होता. ही बाब पत्रकार स्वाती चतुर्वेदी यांनी ट्विट करत निदर्शनास आणून दिली. सदरील ट्विट गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना टॅग केले आहे. या ट्विटची गंभीर दखत घेत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महिलांचा अवमान करणाऱ्यांची महाराष्ट्र सरकार गय करणार नसल्याचे म्हटले आहे.
भाजपची वेबसाइट कोण चालवतं आहेत? असा सवाल करत चतुर्वेदी यांनी महाराष्ट्रातील भाजप खासदार रक्षा खडसे यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह उल्लेखाचा स्क्रीनशॉट ट्विटरवर पोस्ट केला.
सदरील प्रकरणावर खासदार रक्षा खडसे यांनी भाष्य केले आहे. ”ज्यावेळी मला यासंदर्भात माहिती मिळाली. तेव्हा मी वेबसाईट चेक केली. त्यावेळी असा कोणताही उल्लेख माझ्या नावासमोर नव्हता. ज्या लोकांकडून हे व्हायरल झालं आहे, ते पेज सेव्ह महाराष्ट्र फॉर बीजेपी असं आहे. याच पेजवरुन यासर्व गोष्टी व्हायरल होत आहेत. कदाचित माझी बदनामी करण्यासाठीही कोणीतरी फोटोशॉप करुन हे केलेलं असावं, अशी माझी शंका आहे. मी एसपींना यासंदर्भात माहिती दिली आहे. तसेच पक्षालाही कळवलेलं आहे. त्यामुळे खरं नक्कीच पुढे येईल”.
”माझं यासंदर्भात काल एसपींसोबत बोलणं झालेलं आहे. ते देखील याप्रकरणी माहिती घेत आहेत. पण सध्या सोशल मीडियाचं जग एवढं मोठं झालेलं आहे, तंत्रज्ञान एवढं पुढे गेलं आहे. त्याचा वापर करुन एखादी खोटी गोष्टही खरी केली जाते. मला शंका आहे की, फोटोशॉप करुनच या गोष्टी करण्यात आल्या आहेत”. एबीपी माझासोबत बोलतांना त्यांनी हि प्रतिक्रिया दिली आहे.