अजित पवार नेहमिच भाजपावर निशाणा साधण्याच्या प्रयत्नात असतात. पहाटे शपथविधीला येणारे अजित पवार आता भाजपावर सातत्याने टीका करतात. हे अाम्ही सहन करणार नाही. प्रसंगी बारामतीत येऊन प्रत्युत्तर देईन असा दम निलेश राणे यांनी यावेळी भरला. भाजपाच्या प्रदेश सचिवपदी त्यांची नियुक्ती झाल्याबद्दल रत्नागिरी जिल्ह्यात त्यांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निलेश राणे बोलत होते.
आजकाल कुणीही ऊठून राणेंवर टीका करतो. जय-पराजय हा राजकारणाचा भाग आहे. चारवेळा पराभव झाला .म्हणून राणेंना अनेकजण लक्ष्य करत आहेत. त्यामध्ये अजितदादा पवारही आहेत. कोणीही उठतो आणि राणेंवर बोलतो, त्यांना आम्ही का सहन करायचे? हेच अजित पवार पहाटेला शपथविधीसाठी आले, उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबतच्या आमदारांना चोरासारखे धरून शरद पवारसाहेबांसमोर उभे केले गेले. अजितदादांबरोबर आमदार टिकत नव्हते, म्हणून हात जोडून माघारी निघूनही गेले. तोच माणूस आज पूर्वीपेक्षाही जास्त आक्रमकपणे भाजपवर टीका करत आहे. हे सहन करुन घेतले जाणार नाही. असेसुद्धा निलेश राणे यावेळी म्हणाले.
रत्नागिरी जिल्हाध्यक्ष दिपक पटवर्धन यांच्या हस्ते प्रदेश सचिवपदी नियुक्ती झाल्याबद्दल निलेश राणे यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात निलेश राणे यांनी अशाप्रकारे अजित पवारांना लक्ष करीत त्यांच्यावर टीका केली.