भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार अमोल कोल्हे यांच्या नावावर खंडणी’

20

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार अमोल कोल्हे यांच्या नावाने खंडणी उकळणाऱ्याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. विशाल अरुण शेंडगे असे या खंडणी उकळणाऱ्याचे नाव आहे. त्याला मदत करणाऱ्या सुरेश बंडू कांबळे यालाही पोलिसांनी अटक केली आहे.

विशाल शेंडगे हा ‘मी चंद्रकांतदादा बोलतोय’ असं म्हणत पुणे परिसरातील व्यवसायिकांना फोन करायचा आणि त्यांना पैशांची मागणी करायचा. ही बाब उघडकीस आल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पोलिसांकडे तक्रार दिली होती.

पुण्यातील कोथरुड पोलीस स्टेशनमध्ये दोन तर अलंकार पोलीस स्टेशनमध्ये एक असे एकूण तीन गुन्हे विशाल शेंडगे विरोधात नोंद करुन त्याला अटक करण्यात आली होती. या गुन्ह्यातून जामीनावर सुटताच आरोपी विशाल शेंडगेने राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांच्या नावाने बांधकाम व्यवसायिकांना फोन करुन पैशांसाठी धमकवायला सुरुवात केली होती.

वानवडी भागातील व्यावसायिकाला त्याने ‘मी अमोल कोल्हे बोलतोय’ असं म्हणत पैशांची मागणी केली होती. खासदार कोल्हे यांनी याबाबत तक्रार दाखल केल्यानंतर पुन्हा विशाल शेंडगेला पुण्यातील वानवडी पोलिसांनी अटक केली.