कोरोनाच्या काळात स्वतःची पर्वा न करता रुग्णांची सेवा करणारे डॉक्टर्स, नर्स यांचा कोविड योद्धा म्हणून गौरवण्यात आला होता. त्यांचेच आता आर्थिक शोषण व्यवस्थेकडून केले जात आहे. पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावरील जम्बो कोविड सेंटरमध्ये काम करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी आपले आर्थिक शोषण होत असल्याचा आरोप केला आहे. त्यांना थकीत पगार मिळावा या मागणीकरिता कंत्राटी परिचारिका आणि वॉर्डबॉय यांनी बुधवारी जम्बो रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोरच ‘रास्ता रोको’ आंदोलन केले आहे.
पुण्यातील जम्बो कोविड सेंटरमधील नर्स, ब्रदर, कर्मचारी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. आंदोलन करणाऱ्या कंत्राटी नर्से, ब्रदर आणि कर्मचाऱ्यांना गेली तीन महिने पगार दिले गेले नाहीत. या सर्वांना कामावर घेताना एक पगार कपात करण्यात येईल, असं सांगण्यात आले आहे. जम्बो कोविड सेंटरच्या कर्मचाऱ्यांचे थकीत पगार करण्यासाठी 7.5 कोटी पीएमआरडीए जमा झाला असल्याची माहिती पुणे मनपा आयुक्त रूबल आगरवाल यांनी दिली आहे.
या आंदोलनात तब्बल 90 कर्मचारी सहभागी झाले होते. या आंदोलनादरम्यान जम्बोमध्ये येणाऱ्या रुग्णांची गैरसोय होऊ नये तसेच त्यांना अडचण होऊ नये याची खबरदारी घेण्यात आली. आंदोलनात सहभागी झालेल्यांव्यतिरिक्त अन्य परिचारिका रुग्णालयात प्रत्यक्ष काम करीत आहेत. जम्बो कोविड सेंटरमध्ये सध्या 165 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या आंदोलनामुळे रुग्णांच्या उपचारांवर कोणताही परिणाम होणार नसल्याचा दावा आंदोलन करणाऱ्यांनी केला आहे.