‘२१ तारखेपासून रेमडेसिवीरचा राज्यातील पुरवठा वाढत जाईल’

9

रेमडेसिवीरची मागणी राज्यातील सगळ्याच भागातून सातत्याने होत आहे. मागील एक महिन्यापासून अन्न व औषध प्रशासन विभाग रेमडेसिवीर औषध बनविणाऱ्या सर्व कंपन्यांच्या संपर्कात आहे. येत्या २१ तारखेपासून रेमडेसिवीरचा राज्यातील पुरवठा वाढत जाईल व २५ तारखेपर्यंत जवळपास ७० हजार रेमडेसिवीर इंजेक्शन्स दररोज राज्यात पुरवली जातील, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे.

जानेवारी महिन्यात कोरोनाचा धोका कमी झाला होता. कोरोना हा जाण्याच्या मार्गावर आहे असे मत सगळ्यांचे झाले. परंतु कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर पुन्हा रेमडेसिवीरचे उत्पादन सुरू झाले आहे. याच्या एका बॅचची निर्मिती होण्यासाठी कमीत कमी २० ते २२ दिवस लागतात, अशी माहिती राजेंद्र शिंगणे यांनी दिली.

सरकारी रुग्णालयात दोन-तीन रुग्णालयं सोडल्यास रेमडेसिवीरचा फार मोठा तुटवडा जाणवत नाही. मात्र खासगी रुग्णालयाला जो प्रोटोकॉल दिला आहे त्याचे पालन केले जात नाही. पहिल्या दिवसापासूनच रुग्णाला आवश्यकता असो वा नसो रेमडेसिवीर इंजेक्शन दिल्याचे समोर आले आहे. ही चिंतेची बाब असून यातूनच रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण झाला आहे. या त्रुटी सुधारण्याचे प्रयत्न वरिष्ठ पातळीवर सुरू असल्याचे शिंगणे यांनी स्पष्ट केले.