कारंजातील प्राचीन नागनाथ मंदिराच्या जीर्णोद्धारास सुरुवात

75

वाशिम जिल्ह्यातील ऐतिहासिक शहर म्हणून अोळख असणार्‍या कारंजातील वाणीपुरास्थित प्राचीन नागनाथ मंदिराच्या जीर्णोद्धारास सुरुवात झाली आहे. कारंजात प्राचीन काळातील मंदिरांची संख्या प्रचंड आहे. त्यापैकीच वाणीपुरा येथील नागनाथ मंदिरसुद्धा आहे. सद्यस्थितीत मंदिराची अवस्था जीर्ण झाली आहे. त्यामुळे परिसरातील काही युवक मंडळींनी पुढाकार घेत मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कार्यास सुरुवात करीत ऐतिहासिक वारशाचे जतन करण्याचे कार्य हाती घेतले आहे.

कारंजा शहराला प्राचीन ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. वाणीपुरा येथील नागनाथ मंदिराकडे बघितल्यास याची प्रचिती आपल्याला येते. मंदिरांचे बांधकाम पूर्णत: हेमाडपंती असून मंदिराच्या भितींवर देवदेविकांचे कोरीव काम केले आहे. मंदिराची निर्मिती ही शिल्पाकृती केली असून अनेक नक्षिकामेसुद्धा केली असल्याचे याठिकाणी आढळते.

कारंजामध्ये श्री. नृसिंह सरस्वती स्वामी महाराज मंदिर(गुरुमंदिर), सिद्धेश्वर मंदिर तसेच जैन समाजाचे पुरातन मंदिर आहेत. यापैकीच एक नागनाथ मंदिरसुद्धा आहे. त्यामुळे आपल्या एेतिहासीक वारशाचे जतन करणे ही आपली जवाबदारी आहे आणि या जवाबदारीतून प्रेरणा घेऊनच आम्ही हे काम हाती घेतल्याचे सहभागी तरुण सांगतात.

काळाच्या अोघात नागनाथ मंदिर जीर्ण झाले होते. मंदिराची अवस्था बिकट झाली होती. मात्र परिसरातील युवकांनी पुढाकार घेत मंदिराच्या जीर्णद्धारास सुरुवात केली आहे. मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी शहरातूनसुद्धा ऊत्तम प्रतिसाद येत असल्याचे येथील रहिवासी राहुल देशमुख यांनी यावेळी सांगीतले. मंदिराच्या जीर्णद्धारात अतुल एकघरे, सुनिल भिंगारे, दिपक पापडे, राहुल देशमुख, निलय बोन्ते तसेच परिसरातील ईतर युवक विशेष परिश्रम घेत आहेत.