राज्यात पुन्हा पहाटेच्या शपतविधीची पुनरावृत्ती

314

राज्यात गेल्या वर्षी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांनी स्थापन केलेली सत्ता ७२ तासांपेक्षा जास्त काळ टिकू शकली नाही.पहाटेचा तो शपथविधी प्रचंड गाजला, याच पहाटेच्या शपथविधीची पुनरावृत्ती करून देणारी घटना राज्यात पुन्हा घडली आहे. अहमदनगरच्या पारनेर तालुक्यात लोणी हवेली येथे सरपंचपदाच्या निवडणुकीत असा किस्सा पुन्हा घडला.

रातोरात भाजपाने राष्ट्रवादीचा एक सदस्य फोडून त्याला भाजपाच्या बाजूने वळवले, उपसरपंचपदाची ऑफर देऊन भाजपाने त्याला मध्यरात्रीच महादेवाच्या मंदिरात घेऊन शपथविधी सोहळा पार पाडला. 

राज्यातील राजकारणात पहाटेचा शपथविधी गाजला तसाच रात्रीचा शपथविधी सोहळा जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला. पारनेर तालुक्यातील लोणी हवेली गावात बिनविरोध निवडणुका व्हाव्यात यासाठी आमदार निलेश लंके यांनी आवाहन केले होते, परंतु भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष दुधाडे, शत्रुघ्न नवघणे यांनी याला विरोध केला.

गावात सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक झाली. यात ५-४ च्या मताधिक्याने राष्ट्रवादीच्या जान्हवी दुधाडे या सरपंचपदी, तर उपसरपंचपदी अमोल दुधाडे निवडून आले. रात्रीच शपथ घेतलेल्या भाजपच्या संजीवनी दुधाडे, शत्रुघ्न नवघणे यांना पराभव पत्करावा लागला.

निवडणुकीत राष्ट्रवादीचे अशोक दुधाडे, जान्हवी बाजीराव कोल्हे, शिवाजी थोरे, सीमा कोल्हे, अमोल दुधाडे असे पाच जण निवडून आले. तर भाजपचे शत्रुघ्न नवघणे, संजीवनी दुधाडे यांच्यासह अन्य दोन असे चार सदस्य निवडून आले. ग्रामपंचायतीत ५ आणि ४ असं बलाबल झालं.