शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सरकारच्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विशेष मुलाखत घेतली आहे. जुलैमध्ये घेतलेली ‘अनलॉक मुलाखत’ प्रचंड गाजली होती. यानंतर या मुलाखतीवर भाजप नेत्यांनी जोरदार टीकास्त्र सुद्धा सोडलं होतं. आता, ठाकरे सरकारला वर्षपूर्ती होत आहे. याच वर्षपूर्तीच्या निमित्ताने पुन्हा एकदा उध्दव ठाकरे यांची संजय राऊत यांनी मुलाखत घेतली आहे.
उध्दव ठाकरे म्हणाले, सध्या फक्त हात धुतोय; जास्त अंगावर याल तर हात धुऊन मागे लागेन. काहींना डोक्याचे विकार झालेत. त्यांच्यावर उपचार करावे लागतील. मराठी माणसाला गाडून त्यावर कुणाला नाचता येणार नाही! सरकार आज पाडू, उद्या पाडू असे बोलले त्यांचेच दात या काळात पडलेत! असा घणाघात त्यांनी सुरुवातीलाच भाजपचे नाव न घेता केला.
हिंदुत्वाच्या मुद्द्यावर देखील त्यांनी भाष्य केलं. मंदिरं खुली करण्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्वावरच प्रश्न निर्माण केला होता. या मुलाखतीतून त्यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. ‘हिंदुत्व सोडायला ते काय धोतर आहे? हिंदुत्व सोडणे म्हणजे काय? धोतर नाहीये ते.. हिंदुत्व अंगामध्ये, धमन्यांमध्ये असावं लागतं. धमन्यांमध्ये भिनलेली गोष्ट अशी नाही सोडू शकत.’ असा टोला त्यांनी राज्यपालांना व भाजपला नाव न घेता लगावला आहे.