सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केलं आहे. आरक्षण रद्द झाल्याने मराठा समाजातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झालं आहे. मराठा आरक्षण रद्द झाल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकार अडचणीत सापडले आहे.
मराठा आरक्षण प्रश्नांवर सध्या राज्यात ठाकरे सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. त्यावर आता शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही मराठा आरक्षणाचा विषय गांभीर्याने घेतला नाही. त्यामुळे राज्याचे प्रमुख म्हणून त्यांनीही राजीनामा द्यावा, अशी मागणी मेटे यांनी केली आहे. मेटे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत राजीनाम्याची आग्रही मागणी केली आहे.
आरक्षणाचा प्रश्न हाताळण्यात अपयश आल्याने आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पदाचा राजीनामा द्यावा. मात्र, सोबतच उद्धव ठाकरे यांनीही राज्याचे प्रमुख म्हणून जबाबदारी घेत राजीनामा द्यावा अशी मागणी मेटे यांनी केली. मेटे यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली.
अशोक चव्हाण यांच्या घोडचुकीमुळे मराठा समाजाचं आरक्षण रद्द झालं. त्यामुळे जनाची नाही तर मनाची असेल तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. सोबतच राज्याचे प्रमुख असल्याने उद्धव ठाकरे यांनी देख राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी विनायक मेटे यांनी केली आहे.