‘शेतक-यांचे मरण हेच मोदी सरकारचे धोरण’ असून शेतकरी विरोधी तीन काळे कायदे आणल्यानंतर आता रासायनिक खतांच्या किंमती वाढवून शेतक-यांना उद्धवस्त करण्याच्या मोहिमेला मोदींनी वेग दिला आहे. दिडपटीने वाढलेल्या खतांच्या किंमतीमुळे शेतक-यांना शेती करणे परवडणार नाही.
मोठ्या उद्योगपतींना शेती कंत्राटीपद्धतीने देण्याशिवाय त्याच्यापुढे पर्याय राहू नये म्हणूनच ही दरवाढ केली आहे असा आरोप करून दोन दिवसात ही अन्यायकारक खत दरवाढ मागे घ्यावी अन्यथा काँग्रेस पक्ष राज्यभर घंटानाद आंदोलन करेल असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.
गांधीभवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना पटोले म्हणाले की, पेट्रोल-डिझेल, खाद्यतेलांच्या दरवाढीमुळे अगोदरच जनतेचे कंबरडे मोडले असताना रासायनिक खतांच्या दरवाढीचा बोजा शेतक-यांवर टाकला आहे. १०:२६:२६ खताची किंमत ६०० रुपयांनी वाढली आहे.
डीएपीची किंमत ७१५ रूपयांनी, डिएफएच्या गोणीची किंमत आधी ११८५ रुपये होती ती आता १९०० रुपये केली आहे. १०:२६:२६ च्या ५० किलोच्या पोत्याला ११७५ रुपयांऐवजी १७७५ रुपये मोजावे लागणार आहे. तसेच पोटॅशच्या किंमतीही वाढवल्या आहेत. शेतक-यांची लूट करत उद्योगपती मित्रांची घरे भरण्याचे काम मोदी करत आहेत. असा आरोप पटोले यांनी केला.