परभणी जिल्ह्यात रेमडेसिवीर या इंजेक्शनचा काळाबाजार करणार्या जिल्हा शासकीय रुग्णालयातील नीता केशव काळे नामक परिचारिकेसह दत्ता शिवाजी भालेराव या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या एका पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले आहे.
स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आलेवार, पोलिस शिपाई संतोष सानप यांच्यासह औषध निरीक्षक बळीराम दामोदर मरेवाड यांच्या पथकाने मंगळवारी सापळा रचला. त्याप्रमाणे शिपाई संतोष सानप याने इंजेक्शनची बेकायदेशीरपणे विक्री करणार्या व्यक्तीला भेटून माझा नातेवाईक कोरोनाने गंभीर आहे, त्यास इंजेक्शनची गरज आहे, असे विश्वासात घेवून बोलणी सुरु केली. त्याने 15 हजार रुपये किमतीला एक असे दोन इंजेक्शन 30 हजार रुपयांना देण्याचे कबूल केले.
त्याप्रमाणे त्याने नांदखेडा रस्त्यावरील बेलेश्वर मंदिराजवळ पोलिस शिपाई सानप यांना इंजेक्शन देवू, नमूद केले. ठरल्याप्रमाणे इंजेक्शन द्यावयास दाखल झाला. त्याचवेळी पथकाने त्यास ताब्यात घेतले. त्याने दत्ता शिवाजी भालेराव असे आपले नाव असल्याचे सांगून व व्यवसाय नृंसिग स्टाफ डेंटल कॉलेज पाथरी रोड असे असल्याचे नमूद केले. झडती घेतली तेंव्हा त्याच्याजवळ दोन इंजेक्शन आढळून आली. ती इंजेक्शन आपण सिव्हिलमधील अनिता केशव काळे यांच्याकडून 12 हजार रुपयांस एक याप्रमाणे घेतल्याचे म्हटले.
या पथकाने तात्काळ सदर महिलेस ताब्यात घेतले. रुमची झडती घेतली असता 75 हजार रुपये रोख व 7 इंजेक्शन आढळून आली. या परिचारीकेने जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीतील कोविड सेंटरमूधन ते इंजेक्शन चोरल्याचे म्हटले आहे. या पथकाने त्या महिलेकडून मोबाईलही जप्त केला आहे.