परभणी जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. याच पार्श्वभुमीवर शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी स्वतः स्थानिक विकास निधीतून उपलब्ध केलेल्या तरतूदीतून तीन अद्यावत अशा रुग्णवाहिका लवकरच रुग्णसेवेत दाखल होणार आहेत.
खासदार जाधव यांनी गेल्या काही महिन्यांपूर्वीच येथील जिल्हा शासकीय रुग्णालयास अद्यावत अशी कार्डियाक रुग्णवाहिका उपलब्ध करुन दिली. त्यामुळे आपतकालीन स्थितीत रुग्णांना अन्यत्र स्थलांतरित करण्याकरिता मोठी सुविधा उपलब्ध झाली. या रुग्णवाहिकेमुळे रुग्णांसह जिल्हा रुग्णालयाने सुटकेचा निःश्वास सोडला.
कोरोनाच्या या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आणखी तीन रुग्णवाहिकांकरिता खासदार जाधव यांनी स्वतःच्या स्थानिक विकास निधीतून 54 लाख रुपये उपलब्ध केले असून त्याद्वारे प्रत्येकी 18 लाख रुपये किमतीच्या अद्यावत व सुसज्ज अशा तीन रुग्णवाहिका लवकरच रुग्णसेवेत दाखल होणार आहेत.