पश्चिम बंगालमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजप चांगलीच मोर्चेबांधणी करीत आहे. मात्र याचवेळेस सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला धक्क्यावर धक्के बसत आहेत. अलिकडेच तृणमूलच्या काही बड्या नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला. आता तृनमुल काँग्रेसचे आणखी चार महत्वाचे नेते भाजपाच्या वाटेवर असल्याचे सांगण्यात येत आहे. परिणामी ममता बॅनर्जीच्या चिंतेत वाढ झाली आहे.
यामध्ये नुकताच राजीनामा दिलेले, माजी मंत्री राजीब बॅनर्जी, आमदार तथा बीसीसीआयचे माजी अध्यक्ष जगमोहन दालमिया यांची मुलगी वैशाली दालमिया, आमदार प्रबीर घोषाल आणि हावडा महानगरपालिकेचे माजी महापौर रथीन चक्रवर्ती यांचा समावेश आहे. सुत्रांच्या माहितीनुसार हे चारही नेते एका विशेष विमानाने दिल्लीत दाखल झाले आहेत. दिल्लीतच ते भाजपात प्रवेश करण्याची शक्यता अाहे.
राजधानी दिल्लीत शुक्रवारी इस्रायली दुतावासाजवळ झालेल्या बॉम्ब स्फोटाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी आपला दोन दिवसीय बंगाल दौरा रद्द केला आहे. 30 आणि 31 जानेवारीला शाह बंगाल दौऱ्यावर जाणार होते. परंतू दिल्लीत ईस्त्रायली दुतावासाजवळ झालेल्या हल्ल्यामुळे हा दौरा रद्द केला असल्याचे सांगण्यात येत आहे. या दौर्यादरम्यान तृणमुलचे बडे नेते भाजपात सामिल होण्याचे संकेत होते. परंतू शाहांचा दौरा रद्द झाला असल्यामुळे हे चारही नेते दिल्लीत दाखल झाले असल्याच्या शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल कॉंग्रेसला दिवसेंदिवस चांगलेच खिडार पडते आहे. याआधि तृणमूलचे मातब्बर नेते सुवेदू अधिकारी, आ. अरिंदम भट्टाचार्य, यांनी भाजपात प्रवेश केला आहे.