रासप आमदार रत्नाकर गुट्टे यांना ‘ईडी’चा दणका

10

बॅंक घोटाळ्यावरुन ईडीने आमदार रत्नाकर गुट्टे यांच्यावर कारवाई केली असून 255 कोटींची संपत्ती जप्त केली आहे.शेतकऱ्यांच्या नावाने परस्पर कर्ज घेऊन ती विविध कंपन्यांमध्ये गुंतवल्याचे स्पष्ट झाल्यानंतर रासप आमदार रत्नाकर गुट्टे यांना ईडीने मोठा दणका दिला आहे.

तपासात गंगाखेड साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या उपलब्ध माहितीचा गैरफायदा घेत त्यांच्या नावे कर्ज घेतले. बॅंकांनी 2012-13 ते 2016-17 दरम्यान जवळपास 772 कोटींचे कर्ज मंजूर केले आणि 632 कोटींची वाटप केले. हे पैसे लाभार्थी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेच नाहीत.

ईडीने दिलेल्या माहितीनुसार, पीक खरेदी करताना रत्नाकर गुट्टे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शेतकऱ्यांची माहिती घेत एक डेटा बॅंक तयार केला. यानंतर गंगाखेड साखर कारखाना शेतकऱ्यांसाठी कृषी कर्ज मिळवण्याच्या उद्देशाने काही बॅंकांशी जोडला गेला. थोडक्‍यात बॅंकांसाठी ते एजंट झाले आणि शेतकऱ्यांच्या माहितीची पडताळणी करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आली.दुसरीकडे गंगाखेड साखर कारखान्याने शेतकऱ्यांकडून मिळालेल्या स्वाक्षरीचा फायदा घेत हे पैसे वेगवेगळ्या बॅंक खात्यांमध्ये परस्पर टाकले. कंपनीने हा पैसा जमीन तसेच शेअर्स खरेदी करण्यासाठी आणि कर्ज फेडण्यासाठी वापरले.