अनेकांसाठी प्रेरणास्थान असलेल्या सचिन तेंडुलकरनं देशातील सहा राज्यांतील गरीब मुलांच्या उपचाराच्या खर्चासाठी निधी दिला आहे. गंभीर आजाराशी संघर्ष करत असलेल्या मुलांच्या उपचाराचा खर्च त्यांच्या कुटुंबीयांना उचलता येत नाही, अशा गरजूंना ही मदत मिळणार आहे.
कोरोना संकट काळात त्यांनी महाराष्ट्र, आसाम, पश्चिम बंगाल, कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्रप्रदेश येथील १०० मुलांना आर्थिक मदत केली आहे. एकम फाऊंडेशनच्या मदतीनं तेंडुलकरनं या मुलांची माहिती मिळवली आणि त्यानंतर तेंडुलकर फाऊंडेशननं मदत केली.
सचिन तेंडुलकर फाऊंडेशनसह काम करण्याची संधी मिळाली याचा आनंद आहे. आरोग्य विभागात सचिन चांगलं काम करत आहे,”असे एकम फाऊंडेशनच्या अमिता चॅटर्जी यांनी सांगितले.
यापूर्वी तेंडुलकरनं आसामच्या हॉस्पिटलला मोठी मदत केली आहे आणि वंचित कुटुंबातील 2000 मुलांना त्याचा फायदा होणार आहे. आसामच्या चॅरिटेबल हॉस्पिटलला तेंडुलकरनं मेडिकल उपकरणं दान केली आहेत. आसाममधील करिमगंज जिल्ह्यातील माकुंडा हॉस्पिटलमध्ये मुलांच्या वैद्यकीय तपासणीसाठी लागणारी उपकरणं त्यानं दान केली आहेत. नवजात बालकांना याचा सर्वाधिक फायदा होणार आहे.