मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेल्या अवस्थेत अाढळून आलेली कार आणि त्या कारचे मालक असणारे मनसुख हिरेन यांचा झालेला संशयास्पद मृत्यु यांकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. याचेच पडसाद आज(दि.९ मार्च) विधानसभेतसुद्धा पडले. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये या मुद्द्यावरुन चांगलीच जुंपली होती. परिणामी सभागृहाचे कामकाज तहकुब करण्याची वेळ अध्यक्षांवर आली होती.
मनसुख हिरेन यांची हत्या झाली असून क्राईम ब्रांचचे अधिकारी सचिन वाझे हेच या हत्येमागे असल्याचा दावा मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला हिरेन यांनी केला. याच दाव्याचा आधार घेत देवेंद्र फडणवीस चांगलेच आक्रमक झाले. सचिन वाझे यांना तत्काळ निलंबीत करण्यात यावं अशी मागणी त्यांनी यावेळी केली. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याप्रकरणी एटीएस चौकशी करत असल्याचे सांगीतले. परंतू विरोधक सचिन वाझेंच्या निलंबनाच्या कारवाईच्या मागणीवर ठाम आहेत.
दवेंद्र फडणवीस यांनी मनसुख हिरेन यांच्या त्या पत्राचासुद्धा ऊल्लेख केला, ज्यामध्ये सचिन वाझे यांचे नाव लिहीले आहे. तसेच चौकशीच्या नावाखाली त्यांची छळवणुक केली गेली आहे. मनसुख हिरेन यांच्या पत्नींनी सचिन वाझे यांचे नाव घेतले आहे. सचिन वाझे हे एका सत्तेत असणार्या पक्षाचे निकटवर्तीय आहे. त्यामुळे त्यांना पाठीशी घालण्याचे पाप सरकार करत असल्याचे आरोपसुद्धा त्यांनी यावेळी सभागृहात केले.
दरम्यान मुख्यमंत्र्यांनी यावर तत्काळ बैठक बोलावली आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख आणि परिवहनमंत्री अनिल परब यांचा या बैठकीमध्ये समावेश होता. चौकशी पूर्ण होइपर्यंत सचिन वाझेंवर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मनसुख हिरेन प्रकरणांत सचिन वाझेच दोषी आहेत का? असा प्रश्ण सर्वसामान्यांना पडला आहे.