‘सख्ख्या भावाने नाकारलं; कोरोनाग्रस्त आईच्या लेकरांचे आ. निलेश लंके झाले मामा’

131


राष्ट्रवादीचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी आपल्या मतदारसंघातील भाळवणी गावात तब्बल ११,००० खाटांचे सुसज्ज शरदचंद्र पवार कोविड सेंटर उभारले आहे. सर्व रुग्णांची स्वतः आमदार निलेश लंके काळजी घेत असल्याचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेतत्यामुळे आमदार निलेश लंके यांचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.

आता आमदार निलेश लंके यांनी अजून एक कौतुकास्पद काम केलं आहे. निलेश लंके चांगल्या कामासाठी चर्चेत असतात. निलेश लंके यांनी उभारलेल्या शरद पवार आरोग्य मंदिर कोविड सेंटरमध्ये एका कुटुंबातील कोरोनाबाधित आई-वडील उपचार घेत आहेत. मात्र, कोरोना बाधित असल्याचं समजल्यानंतर आपल्या लेकरांना कोण सांभाळणार असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला.

या माऊलीने सख्ख्या भावाकडे मदत मागितली. मात्र, स्वतःच्या भावाने त्या लेकरांची जबाबदारी घेण्यास nakar दर्शवला. त्यामुळे आपल्या लेकरांचा सांभाळ कोण करणार अशी चिंता सदरील दाम्पत्याला पडली. हा आईच्या मदतीला आमदार निलेश लंके धावून आले आहेत. लंके यांनी त्या लेकरांची मामा म्हणून स्वतः जबाबदारी स्वीकारली. यामुळे आता आई-वडील निर्धास्तपणे कोरोनाशी सामना करत आहेत. याबाबत निलेश लंकेनी फेसबुकवर एक भावनिक पोस्ट केली आहे.

आमदार निलेश लंके यांची फेसबुक पोस्ट

मी आहे ना…त्या लेकरांची जबाबदारी घेतो.

कोरोना आजाराने अनेक ठिकाणी गावागावात कुटुंब उद्ध्वस्त झाली असून माणुसकीला काळीमा फासणारी अनेक उदाहरणे आता गावागावात पुढे येऊ लागली आहे. असेच एक उदाहरण राहुरी तालुक्यातील एका गावातील असून एका कुटुंबातील आई, वडील कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने कुटुंबातील लहान भाऊ बहीणीला कुठे ठेवायचे असा प्रश्न या कुटुंबापुढे निर्माण झाला.

हे कुटुंब माझ्या भाळवणी येथील शरदचंद्र पवार कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी गेल्या सात ते आठ दिवसांपूर्वी दाखल झाले होते. परंतु उपचार घेत असताना आपल्या कोरोनाबाधित आईने राहुरी येथील भावाला फोनवरून मी व तुझा दाजी कोरोना बाधित आढळून आले असून तुझ्या भाचा व भाचीला आम्ही बरे होईपर्यंत तुझ्याकडे ठेव, अशी विनंती केली. परंतु महिलेच्या भावाने नकार देत आम्ही त्यांना ठेवू शकत नाही त्यामुळे त्यांची व्यवस्था तु दुसरीकडे कर, असे ठणकावून सांगितले. या कुटुंबातील प्रमुखांसह या दोन भावा-बहिणीने पुढे मोठा पेच निर्माण झाल्यानंतर ही गोष्ट मला समजली.

मी या कुटुंबाला आधार देत तुम्ही या ठिकाणी निश्चिंतपणे उपचार घ्या, तुमच्या दोन्ही मुलांची जबाबदारी माझी, असे म्हणून सेंटरमध्ये ज्या ठिकाणी कार्यकर्त्यांचा राबता असतो त्या ठिकाणी दोन स्वतंत्र बेड लावून दोन्ही भावा-बहिणींची गेल्या आठ दिवसांपासून ते सेवा करत आहे.माझ्या कुटुंबातील सदस्य या नात्याने काळजी घेत आहेत. मी यांच्या पालकत्वाची जबाबदारी घेतो.त्यामुळे अंगावर असणाऱ्या कपड्यानिशी या दोघा भावाबहिणींना सुद्धा त्यांच्या बरोबर यावे लागले. त्यामुळे  या दोघा भावा- बहिणींना नवीन कपडे बुधवारी घेऊन दिले आहे.

कोरोनाला हरवायचे माणुसकीला नाही

गेल्या दोन वर्षाच्या कार्यकाळात कोरोनामुळे माणुसकीला काळीमा फासणार्‍या अनेक घटना ऐकू येत आहेत. अनेक मुले व कुटुंबातील सदस्य कोरोनाबाधित आई-वडिलांसह सदस्यांना पाहत नाही तर दुसरीकडे उपचारासाठी दाखल झालेल्या अनेकदा रुग्णांकडे संपूर्ण कुटुंब पाठ फिरवत आहे. त्यामुळे आपल्याला कोरोना आजाराला हरवायचे आहे माणुसकीला नाही.