एमपीएससी परीक्षेचं संघीकरण करण्यात येत असून परीक्षेतील प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून भाजपा धार्जिणा राजकीय प्रचार होत असून काँग्रेस विरोधी भूमिका रुजवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोप महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत होणारा भाजप धार्जिणा प्रचार रोखावा आणि अशा प्रकारच्या प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेउन केली. जाणीवपूर्वक संघ विचारधारेशी संबंधित अभ्यासक्रम रुजवला जात असल्याचं यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे.
‘गेल्या आठवड्यात घेण्यात आलेल्या परीक्षेत भारत सरकार किंवा केंद्र सरकार असा उल्लेख टाळून आवर्जून मोदी सरकार असा उल्लेख असलेला उतारा प्रश्नपत्रिकेत सामील करण्यात आला होता.
याच प्रश्नपत्रिकेत काँग्रेसने ब्रिटिश शिक्षण पद्धती निवडली, असा तथ्यहीन आरोप असलेला उतारा जाणीवपूर्वक समाविष्ट करण्यात आला. यातून काँग्रेसची बदनामी करण्याचा हेतू स्पष्ट होत आहे.’ असे धक्कादायक आरोप राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केले आहेत.