पुणे पदवीधर मतदार संघातुन भाजपची उमेदवारी सांगलीच्या संग्रामसिंह देशमुखांना झाली जाहीर

6

येत्या 1 डिसेंम्बरला होणाऱ्या पुणे पदवीधर मतदार संघाची भाजपची उमेदवारी कडेगाव येथील संग्रामसिंह देशमुखांना जाहीर झाली आहे. देशमुख हे भाजपचे नेते, सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, सांगली जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष, ग्रीन पॉवर शुगर गोपूज कारखान्याचे संस्थापक आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील तरुण पिढीचे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. यांची उमेदवारी जाहीर झाल्यामुळे सांगली जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. 6 महिन्यांपूर्वी त्यांना पदवीधर तयारीला लागा, अशा सूचना देण्यात आल्या होत्या.

देशमुखांच्या कार्याची दखल घेत त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पुणे पदवीधर मतदारसंघात भाजप व राष्ट्रवादीत अटीतटीचा सामना होणार आहे. भाजपने संग्रामसिंह देशमुखांना सांगलीतुन उमेदवारी दिली आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीकडून सांगली जिल्ह्यातील अरुण लाड यांना उमेदवारी देण्याच्या चर्चा सुरू आहेत. यांची उमेदवारी जाहीर झाली तर सांगली जिल्हा पुणे पदवीधर निवडणुकीच्या राजकारणात केंद्र बनणार आहे.

संग्रामसिंह देशमुख हे खानापूरचे दिवंगत माजी आमदार संपतराव देशमुख यांचे सुपुत्र आहेत. त्यामुळे देशमुखांकडे मोठा राजकीय वारसा आहे. त्यांना यापूर्वी पलूस-कडेगाव मतदारसंघातील विधानसभेच्या पोटनिवडणूकित उमेदवारी दिली होती. त्यावेळी पक्षीय आदेशानंतर त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेत विश्वजीत कदमांना वाट मोकळी करून दिली होती.

पुणे पदवीधर मतदार संघात भाजप पक्षाकडून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. त्यात भाजपने नाव जाहीर करून प्रचाराला सुरवात केली आहे. भाजपकडून, शेखर चरेगावकर, माजी आमदार मेधा कुलकर्णी, राजेश पांडे, सचिन पटवर्धन, प्रसन्नजीत फडणवीस, शौमिका महाडिक, माणिक पाटील या नावांची चर्चा रंगली होती. त्यात संग्रामसिंह देशमुखांनी बाजी मारली.