महाराष्ट्राच्या राजकारणात अनाकलनीय घटनांची कमी नाहीय. अशाच एका घटनेची आज वर्षपूर्ती आहे.
आज एक वर्षापूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहाटे पहाटे शपथविधी घेत महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती. त्यांच्या पहाटेच्या शपथविधीला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे.
त्यावरून शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी टोला लगावला आहे. पहाटेनंतर त्यांना धक्के बसले, त्यातून ते अद्याप सावरलेले नाहीत. असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते मिडियासोबत बोलत होते.
“ती पहाट नव्हती तो अंधकार होता. आम्हाला कोणताही धक्का बसला नव्हता. आमच्या सर्व स्मृती सुखदायक आहेत. त्या पहाटेच्या सुद्धा. पहाटेनंतर त्यांना धक्के बसले, त्यातून ते अद्याप सावरलेले नाहीत. पहाटे पहाटे मला जाग आली. अजून ते झोपलेले नाहीत,” असा टोला संजय राऊत यांनी लगावलाय. “पुन्हा ती पहाट येणार नाही, कधीच येणार नाही,” असाही विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.