आळंदीत संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त कार्तिकीवारी कार्तिकी वद्य अष्टमी ८ डिसेंबरपासून भरणार आहे. तर अष्टमी एकादशी ११ डिसेंबरला आणि संजीवनी समाधी सोहळा दिन कार्तिकी वद्य त्रयोदशी १३ डिसेंबरला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी यंदाचा संत ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा अर्थातच कार्तिकी वारीतील प्रमुख कार्यक्रम मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थित पार पडावेत असा संदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी शुक्रवारी(दि ४ ) उशिरा जारी केला आहे.
त्रिर्थक्षेत्र आळंदीत भाविकांची गर्दी टाळण्यासाठी खबरदारी म्हणून आळंदीसह आसपासच्या अकरा गावात ६ ते १५ डिसेंबर पर्यंत संचार बंदी लागू करण्यात येणार आहे. संचार बंदी काळात मंदिरात केवळ देवस्थानचे नैमित्तिक कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पंढरपूरातून कार्तिकी वारीसाठी श्री पांडुरंग, संत नामदेवराय, संत पुंडलिक राय या मनाच्या तिन्ही दिंड्याना राज्य शासनाकडून प्रत्येकी वीस वारकऱ्यांना आळंदीत प्रवेशासाठी परवानगी दिली आहे.
माऊलींच्या महाद्वारातील गुरू हैबताबाबा पायरी पूजन परंपरेप्रमाणे होणार आहे. या पूजेला केवळ ५० जणांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. तर इतर कार्यक्रमांना फक्त २० ते ३० जणांची उपस्थिती असणे बंधनकारक आहे.तसेच तिन्ही दिंड्या ८ डिसेंबरला एसटीने आळंदीत दाखल होणार आहेत.