सातारा जिल्ह्यातील आरफळ गावचा पुत्र प्रथमेश उमेश पवार-पाटील यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत यश मिळविले आहे. या परीक्षेत देशात तृतीय, तर महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाचा मान मिळविला असून, त्यांची सीएपीएफ (सेंट्रल आर्म पोलीस फोर्स) मध्ये असिस्टंट कमांडंट म्हणून निवड झाली आहे.
प्रथमेशने मिळवलेल्या यशामुळे त्याच्यावर अभिनंदनाचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्याचं माध्यमिक शिक्षण साता-यात आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगपर्यंतचं शिक्षण पुण्यात झाले. नंतर दोन वर्ष जीवतोड मेहेनत घेत प्रथमेशने हे घवघवीत यश मिळवलं आहे. या यशात आई सुरेखा, वडील व चुलत्यांचा मोठा वाटा असल्याचे प्रथमेश सांगतात.
आपल्या या यशाविषयी सांगताना प्रथमेश म्हणाले, कठीण परिस्थितीत शिक्षण घेत असताना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत होते, अशा परिस्थितीत घरात बीएसस्सी झालेले चुलते, त्यांना आलेले अपंगत्व आणि वडिलांच्या वर पडलेली संपूर्ण घराची जबाबदारी, त्यात आमच्या भावंडांचे शिक्षण, दवाखान्याचा खर्च आणि दुष्काळ अशा परिस्थितीचे चटके सहन करावे लागत होते.
प्रथमेश यांना पहिल्या दोन प्रयत्नांत मुलाखतीपर्यंत जाऊनही अपयश आले होते. या अपयशानेही न खचता त्यांनी कठोर परिश्रमाच्या जोरावर तिसऱ्या प्रयत्नात यशाला गवसणी घातली. देशात तिसऱ्या, तर महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाने येण्याचा मान त्यांनी मिळविला आहे. प्रथमेश पवार यांच्या या यशाने साताऱ्याचे नाव आणखी उंचावले आहे; तर या यशाबद्दल त्यांचा विविध मान्यवरांनी सत्कार केला.