सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बॅकलॉग परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

17

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बॅकलॉग आणि श्रेणी सुधार परीक्षा दि. 8 डिसेंबरपासून सुरू होत आहेत. हि परीक्षा ८ डिसेंबर ते २३ डिसेंबर या कालावधीमध्ये ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. त्यापूर्वी तीन दिवस विद्यार्थ्यांची सराव परीक्षा (माॅक टेस्ट) घेतली जाणार आहे. यासाठी विद्यापीठाची यंत्रणा सज्ज झाली आहे. पुणे विद्यापीठाने ऑक्टोबर महिन्यात अंतिम वर्षाच्या परीक्षा घेतल्या. अंतिम वर्षाच्या परीक्षेत विषयांचे प्रश्नसंच काढण्यापासून ते ऑनलाइन पद्धतीतील त्रुटींमुळे परीक्षेमध्ये अडचणी आल्या होत्या. या अडचणी बॅकलॉकच्या परीक्षेमध्ये येऊ नये, यासाठी विद्यापीठाने सुधारणा केल्या आहेत.

विद्यार्थ्यांना अभ्यासाला लॉकडाउनमुळे वेळ मिळाल्याने, अनेक विषयांच्या परीक्षा 100 टक्के अभ्यासक्रमावर होणार आहे. ऑनलाइन परीक्षांचा अंदाज येण्यासाठी विद्यापीठाने विद्यार्थ्यांना सराव परीक्षेची संधी उपलब्ध करून दिली होती. या परीक्षेसाठी कॅमेराचा वापर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांचे काही छायाचित्रे देखील काढण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्याव्यतिरिक्त अन्य हालचाली झाल्याचे आढल्यास त्याबाबतचा इशारा विद्यार्थ्यांना दिला जाणार आहे. त्यामुळे या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना कोणताही गैरप्रकार करता येणार नाही.

बॅकलॉगच्या परीक्षेत सुमारे २ हजार २०० विषयांची परीक्षा घेतली जाणार आहे. सुमारे अडीच ते पावणेतीन लाख विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. ही परीक्षा बहुपर्यायी प्रश्न पद्धतीने फक्त ऑनलाईन माध्यमातून होणार आहे. यासाठी एका तासाचा कालावधी असून, ६० प्रश्नांपैकी ५० प्रश्न सोडविण्यासाठी अनिवार्य आहे. या ६० पैकी ४० टक्के सोपे, ४० टक्के मध्यम तर २० टक्के अवघड प्रश्न विचारले जातील. परीक्षा आयोजनापूर्वी किंवा परीक्षेदरम्यान येणाऱ्या अडचणी व शंकांचे निरसन करण्यासाठी विद्यार्थी sps.unipune.ac.in मध्ये लॉगइन करून तक्रारी नोंदवु शकतात. तसेच विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयस संपर्क साधावा, असे परिपत्रकात नमूद केले आहे.