सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये येत्या ११ जानेवारीला सुरू होणार आहेत. गेल्या महिन्याभरापासून महाविद्यालये सुरू कधी होणार याची प्रतीक्षा लागलेली असताना याबाबत निर्णय झाला आहे. सर्व अभ्यासक्रमांचे थेट वर्ग आणि प्रॅक्टिकल सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कॉलेजेस सुरू असताना कोरोनाच्या नियमांचे पालन आणि खबरदारी घेण्याच्या सूचना विद्यापीठ प्रशासनाने दिल्या आहेत.
हे वर्ग सुरू करताना विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) आणि राज्य शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आदेश सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दिले आहेत. विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये सुरू करण्यासाठी प्राचार्य व्ही. बी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. या समितीची सोमवारी विद्यापीठात बैठक झाली. त्यानंतर महाविद्यालये प्रत्यक्षपणे सुरू करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्याबाबतचे परिपत्रक विद्यापीठाने प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे आता प्रोजेक्ट, पदव्युत्तर स्तरावरील विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक पूर्ण करण्यात येणार आहेत.
फिजिकल डिस्टँसिंग तसेच स्वच्छतेचे सर्व नियम पाळून वर्ग भरवले जाणार आहेत. महत्वाचे म्हणजे पालकांची संमती घेऊनच मुलांना महाविद्यालयामध्ये पाठवलं जाणार आहे. सुरवातीला अंतिम वर्षाच्या किंवा स्पेशल विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू करता येतील का? विज्ञान विषयाचे प्रॅक्टिकल्स सुरु करणे योग्य ठरेल का अशा विविध विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली आहे.