राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात 1 मे पासून उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 13 जून पर्यंत सुट्टीचा कालावधी ग्राह्य धरावा व पुढील शैक्षणिक वर्षात 14 जून पासून शाळा सुरु कराव्यात, असे आदेश परभणी येथील शिक्षण संचालक डी.जी. जगताप यांनी शुक्रवारी काढलेल्या एका पत्रकाद्वार दिले आहेत.
शाळातून उन्हाळ्याची, दिवाळीची सुट्टी कमी करुन त्याऐवजी गणेशोत्सवात, इतर नाताळासारख्या सणांच्याप्रसंगी ती समायोजनाने संबंधित जिल्ह्यांच्या शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांच्या परवानगीने देण्यात येत आहे.
माध्यमिक शाळा संहिता नियम 52.2 नूसार शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या एकूण सुट्ट्या 76 दिवसांपेक्षा जास्त होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, असे या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
पुढील शैक्षणिक वर्षात शाळा सुरु करण्यासंदर्भात कोविडबाबत तत्कालीन परिस्थिती विचारात घेवून शासनस्तरावरून वेळोवेळी जे आदेश निर्गमित होतील, ते यथाअवकाश संचालनालयाकडून निर्गमित केले जातील, असे म्हटले आहे.