कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता गृहमंत्री अमित शहा यांनी कोरोना लसीकरण मोहीमेचा वेग वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच, कोरोना लसीकरणाबद्दल मोदी सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत असून नवा प्लान देखील तयार करण्यात आला आहे.
देशात साधारण ५० वर्षांहून अधिक वय असणाऱ्या व्यक्तींची संख्या २७ कोटींच्या घरात आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची लस देणं आवश्यक असल्याने आणि या व्यक्तींना कमी वेळात लस उपलब्ध व्हावी, यासाठी केंद्र सरकार खासगी क्षेत्राची मदत घेणार असल्याचे सांगितले जात आहे.
दर १० हजार लसींच्या डोसपैकी २ हजार डोस खासगी कंपन्यांकडून दिले जात आहे. लसीकरण अभियानाचा वेग वाढल्यावर त्यातील खासगी क्षेत्राचा सहभाग आणखी वाढेल. लसीकरण अभियानात खासगी क्षेत्राची मोठी भागिदारी गरजेची आहे.
जेष्ठ व्यक्तींना कोरोनाचा धोका अधिक असल्याने त्यांना कोरोनाची लस लवकरात लवकर देणं आवश्यक आहे. याकरता केंद्र सरकारने खासगी क्षेत्राची मदत घेऊन जेष्ठ व्यक्तींचं लसीकरण प्राधान्याने पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे.
दररोज देशात कोरोना बाधितांची संख्या वाढत असून यामध्ये महाराष्ट्र, केरळ, छत्तीसगड, पंजाबसह मध्यप्रदेशातही कोरोना बाधितांचा आलेख वाढता असल्याने देशाची चिंता अधिक वाढली आहे.