एमआयएमने सीमांचल भागातील २१ मतदारसंघात उमेदवार उभे केले होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत फक्त एका जागेवर विजय मिळवलेल्या एमआयएम ने यावेळी मात्र जोरदार मुंसडी मारत पाच जागा जिंकल्या आहेत. सीमांचलने ‘धपा धप दिया’ असं म्हणत एमआयएमचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी बिहार विधानसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला. पक्षाचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी आणि इम्तियाज जलील या दोघांनी दोन आठवडे या भागात जोरदार प्रचार केला होता. एकवरून पाच आमदार अशी चांगली प्रगती झाल्याबद्दल इम्तियाज जलील यांनी समाधान व्यक्त करत ट्विट केलं आहे.
एमआयएम मुस्लिमांचा पक्ष, जहाल, जातीयवादी अशी आमची प्रतिमा तयार करण्यात आली होती. त्यामुळे कुठलाही राजकीय पक्ष आमच्या सोबत यायला तयार नव्हता. पण ओवेसींच्या नेतृत्वाखाली लोकसभा निवडणुकीत आम्ही औरंगाबादला यश मिळवले. बिहार विधानसभा निवडणुकीत ताकदीने मैदानात उतरलो. त्यामुळे भल्याभल्या पक्षांनी एमआयएमचा धसका घेतला होता. आम्ही चांगली कामगिरी केल्याने आम्ही आनंदी असल्याचं इम्तियाज जलील म्हणाले.