परभणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी दुपारी वाळूची अवैध वाहतुक करणारे दोन ट्रॅक्टर जप्त केले. या कारवाईत सहा लाख 12 हजार रुपयांचा मुद्देमाल पथकाने जप्त केला आहे.
परभणी जिल्ह्यातील सेलू शहरात वाळूची अवैध वाहतुक मोठ्या प्रमाणावर होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून जिल्हा पोलिस अधीक्षक जयंत मीना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे फौजदार विश्वास खोले, फौजदार चंद्रकांत पवार, आदींच्या पथकाने आज दुपारी दोनच्या सुमारास सेलू शहरातुन वाळूची वाहतुक करणार्या ट्रॅक्टरला थांबवले.
चालकाकडे वाळूबाबत विचारणा केली. मात्र, त्याच्याकडे कुठलीही पावती आढळली नाही. अवैध वाळू उपसा करीत चोरट्यापध्दतीने ती वाळू विक्री करण्याच्या उद्देशाने आणली असल्याचे समजताच पथकाने दोन ट्रॅक्टर जप्त केले.
यावेळी दोघांना पथकाने ताब्यात घेतले. या प्रकरणी सेलू पोलिस ठाण्यात चार जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दोघांना ताब्यात घेत सेलू पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.