उंडाळे (तालुका कराड) गावचे रहिवासी सातारा जिल्ह्यातील काँग्रेसचे दिग्गज नेते म्हणून ओळखले जाणारे माजी सहकारमंत्री विलासराव (काका) पाटील – उंडाळकर (वय ८४) यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण जिल्ह्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांनी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात सलग 35 वर्ष त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसचे प्रतिनिधित्व केले होते.
विलासराव पाटील-उंडाळकर यांनी शेवटची मुलाखत दैनिक ‘पुढारी’ला दिली होती. एक नोव्हेंबर रोजी विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या सातारा येथील निवासस्थानी ‘पुढारी’चे कराड विभाग प्रमुख सतीश मोरे यांनी विलासराव पाटील-उंडाळकर यांची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत त्यांनी शेवटपर्यंत मी काँग्रेस सोडणार नाही. काँग्रेस माझ्या रक्तात आहे, असे विधानही केले होते.
मागील काही दिवसांपासून विलासराव पाटील-उंडाळकर यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर सातारा येथे उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाल्याने संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्यामुळे जिल्ह्यातील कॉंग्रेसचा भक्कम आधारस्तंभ कोसळला आहे. आज दुपारी कराड तालुक्यातील उंडाळे येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.