पाकिस्तानात राहणारी 64 वर्षीय बानो बेगम ही 35 वर्षांपूर्वी एटा जिल्ह्यातील एका गावात तिच्या नातलगांकडे आली होती. यानंतर तिने तेथील अख्तर अली या युवकाशी लग्न केले. तेव्हापासून ती भारतीय व्हिसा मिळवून भारतात राहते. मात्र, तिला अद्याप भारताचे नागरिकत्व मिळालेले नाही.उत्तर प्रदेशमधील एटा जिल्ह्यात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील एका गावात चक्क पाकिस्तानी महिला सरपंच बनली आहे.
बानो बेगम हीने 2015 मध्ये झालेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीसाठीही अर्ज दाखल केला होता. या निवडणुकीत बानो बेगमचा विजय झाला होता. यानंतर पाच वर्षांनी जानेवारी महिन्यात गावच्या सरपंच शहनाज बेगम यांचे निधन झाले. यानंतर, बानो बेगम काही राजकीय समीकरणे जोडून गाव समितीच्या शिफारशीने गावची सरपंच झाली.
गावातील स्थानिक नागरिक कुवैदन खान यांना या महिलेचा संशय आला. यानंतर त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांत तक्रार दाखल होताच या महिलेने सरपंच पदाचा राजीनामा दिला आहे. जिल्हा पंचायत राज अधिकारी (DPRO) आलोक प्रियदर्शी यांनी एटा जिल्हा दंडाधिकारी सुखलाल भारती यांच्यासमोर हे प्रकरण सादर केले आहे. त्यांनी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करून चौकशीचे आदेश दिले आहेत.बानो यांना सरपंच म्हणून नियुक्त करण्याची शिफारस करणारे ग्राम सचिव ध्यानपाल सिंह यांची देखील त्यांच्या पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे.