अंबरनाथ शहरात राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी असलेल्या ऐश्वर्या मोटे यांनी एका पोलिसाविरुद्ध बलात्कार केल्याचा गंभीर गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी गुन्हा दाखल न करण्यासाठी आणि दाखल केलेला गुन्हा मागे घेण्यासाठी आपल्यावर दबाव टाकण्यात येत आहे, असा आरोप या महिला पदाधिकाऱ्याने केला आहे. त्यामुळे अंबरनाथ शहरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी मोटे यांनी शहराध्यक्ष सदाशिव पाटील यांच्याविरोधात थेट प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. तसेच रविवारी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे अंबरनाथमध्ये आलेल्या असतानाही मोटे यांनी त्यांची भेट घेत कैफियत मांडली.
सदाशिव पाटील हे आपल्याला फोन करून गुन्हा दाखल करू नको, असं सांगत होते. तसेच हा गुन्हा दाखल झाल्यानंतरही गुन्हा मागे घेतल्यास 20 लाख रुपये घेऊन देतो, असं आमिष पाटील यांनी दाखवल्याचा आरोप ऐश्वर्या मोटे यांनी केला आहे.
त्याशिवाय फसवणूक केल्याचाही गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी संबंधित पोलीस मिलिंद हिंदुराव याला अजूनही अटक करण्यात आलेली नाही.