कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शक्कल; राज्यात कोरोनामुक्त गाव स्पर्धेचे आयोजन

30

राज्यातील ग्रामीण भागातील कोरोनामुक्तीच्या कामाला प्रोत्साहन मिळावे व गावे लवकरात लवकर कोरोनामुक्त होऊन त्याद्वारे तालुका, जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्य लवकरात लवकर कोरोनामुक्त व्हावे यासाठी राज्यात कोरोनामुक्त गाव स्पर्धेचे आय़ोजन करण्यात येणार असल्याची घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकताच जनतेशी संवाद साधताना कोरोना संसर्गाला गावच्या वेशीवरच रोखलेल्या गावांचा गौरव केला होता. या उपक्रमास आता अधिक चालना देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.

कोरोनामुक्त गाव स्पर्धेत प्रत्येक महसूल विभागात चांगली कामगिरी करणाऱ्या पहिल्या ३ ग्रामपंचायतींना अनुक्रमे ५० लाख रुपये, २५ लाख रुपये व १५ लाख रुपये याप्रमाणे बक्षीस दिले जाणार आहे. राज्यातील ६ महसुली विभागात प्रत्येकी ३ प्रमाणे राज्यात एकूण १८ बक्षीसे दिली जातील. यासाठी बक्षीसांची एकूण रक्कम ५ कोटी ४० लाख रुपये असेल.